ganpati-song

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

मनोरंजन

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीच्या साईराज केंद्रे याने या गाण्यावर एक रील केला होता. त्यानंतर हे गाणं आणि त्याचं रील तुफान व्हायरल झाले.पण या गीताचा मूळ गीतकार आणि गायक मात्र फारच कमी जणांना माहित आहे.

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा मूळ गीतकार एक वडापाव विक्रेता आहे. या गीतकाराने पाच वर्षापूर्वी वडे तळता तळता या गाण्याची धून तयार केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी हेच गाणे गायले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मात्र त्या मानाने त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती.

पण सध्या हे गाणं चांगलंच गाजत असून त्या चिमुकल्या मुलांची आणि मूळ लेखकाची सगळेच जण दखल घेत आहेत. ‘आमच्या पप्पानी गणपती आणला’ हे गाणं मुंबईतील भिवंडी भागातील वडापाव विक्रेता मनोज घोरपडे याने लिहिले आहे. तर त्यांचीच मुलं त्यांचा मोहित आणि मुलगी शौर्य यांनी हे गाणं गायलं आहे. मध्यमवर्गीय घोरपडे कुटुंबीय वडापाव विकून उदरनिर्वाह करते.

दरम्यान, मनोज यांना लहानपणापासूनच लिहिल्याचा छंद आहे. वडापाव करताना सुद्धा त्यांनी हा छंद आनंदाने जोपासला आहे. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी ‘आमच्या पप्पांनी आणला’ हे गाणे लिहिले होते. त्यानंतर आपल्या मुलांकडूनच गेल्यावर्षी त्यांनी हे गाणं गाऊन घेतले. मागील वर्षी बनविलेल्या या गाण्याला वर्षभरात दोन मिलियन व्हूज मिळाले होते, पण साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर मात्र हे गाणं ऐकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यंदाच्या गणेशोस्तवात प्रत्येक मंडळात हे गाणं वाजणार हे निश्चित.