‘बिग बॉस मराठी’ मधून सचिन कुमावत बाहेर; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर

मनोरंजन

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये दर आठवड्याला नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सहाव्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची चर्चा रंगली असतानाच ‘भाऊच्या धक्क्यावर’ मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. खान्देशचा किंग म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत याचे एलिमिनेशन झाले आहे.

सचिनने घरात सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रामाणिकपणे खेळ करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कोणताही वाद न घालत, शांत आणि संयमी स्वभावामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र कमी मतांमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

घराबाहेर आल्यानंतर सचिन कुमावतने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खानदेशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खास होता. ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोणाचाही द्वेष न करता प्रामाणिकपणे खेळू शकलो, याचा अभिमान आहे. या प्रवासात दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.”

तसेच महाराष्ट्राने दिलेल्या अपार प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. लवकरच पुन्हा भेटू,” असेही त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘बिग बॉस मराठी’मुळे सचिन कुमावत खान्देशात घरोघरी पोहोचला. त्याची ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ आणि ‘सचिनच रस प्यायला ये म्हणलं माय’ ही गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.

आता घराबाहेर पडल्यानंतर सचिन कुमावत कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.