‘मर्दानी ३’ थिएटरनंतर कुठे पाहता येणार? राणी मुखर्जीच्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट

मनोरंजन

मुंबई: बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी अलीकडच्या काळात मोजकेच चित्रपट करत असली, तरी तिच्या प्रत्येक चित्रपटाची खास चर्चा होते. सामाजिक विषयांवर भाष्य करणारे, वास्तववादी कथानक असलेले चित्रपट हीच राणीची ओळख बनली आहे. त्यामुळेच तिच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असते.

राणी मुखर्जीच्या हिट चित्रपटांमध्ये मर्दानी फ्रँचायझीचा उल्लेख आवर्जून केला जातो. मर्दानी आणि मर्दानी २ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर मर्दानी ३ शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, बॉर्डर २ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतानाच मर्दानी ३ नेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटसृष्टीत ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या राणी मुखर्जीचा हा चित्रपट रिलीज होताच, त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आजकाल अनेक प्रेक्षक चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याऐवजी ओटीटीवर पाहणे पसंत करतात. तुम्हीही राणी मुखर्जीचे चाहते असाल आणि मर्दानी ३ घरबसल्या पाहण्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे.

प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मर्दानी ३ ला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल ३.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा धडाकेबाज पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय यांच्या भूमिकेत दिसत आहे. राणीला पुन्हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहून चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत. मर्दानी ३ नेटफ्लिक्सवर कधी रिलीज होणार, यासाठी आता प्रेक्षकांना निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत हा चित्रपट तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये पाहू शकता.