मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे. स्पेशल क्राइम युनिटमध्ये नव्याने आलेल्या पोलीस अधिकारी जेजेने युवराजला अटक केली होती. मात्र, पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनले आहे.
युवराज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने केदारला स्वतः निर्दोष असल्याची बातमी प्रसारित करण्यास सांगितले. दुसरीकडे, तारिणी आणि तिची टीम अनेक दिवसांपासून गुलाबच्या खऱ्या बॉसचा शोध घेत असून, आता तो लवकरच सर्वांसमोर येणार असल्याचे नव्या प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे.
प्रोमोमध्ये केदार तारिणीसमोर युवराजबाबतचे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच खांडेकर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर कामत तिथे येऊन त्याला थांबवतात. यामुळे डॉक्टर कामतच या संपूर्ण कटामागचा मास्टरमाइंड असल्याचा संशय प्रेक्षकांमध्ये बळावत आहे.
दरम्यान, युवराजला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. “गुलाब गेला, पण खेळ अजून संपलेला नाही,” असा इशारा त्याला दिला जातो. त्यानंतर युवराज म्हणतो, “गेम लेव्हल अप झालाय… आता माझी गुलाबच्या बापाशी भेट होणार आहे.”
हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रेक्षकांनी डॉक्टर कामतवर संशय व्यक्त केला आहे. तसेच युवराजची भूमिका साकारणाऱ्या प्रशांत केनी यांच्या अभिनयाचेही भरभरून कौतुक केले जात आहे. आता गुलाबचा खरा बॉस कोण आणि पुढे कथानक कोणते वळण घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.