‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय

मनोरंजन

जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार लागतो आणि तिची स्मृती जाणार का, अशी भीती प्रेक्षकांना वाटू लागते. नेहमीच्या मालिकांप्रमाणे ‘मेमरी लॉस’ ट्रॅक येणार का, याबाबतही चर्चा रंगते.

मात्र नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. रुग्णालयात पार्थ काव्याचा हात धरून म्हणतो, “मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट स्वीकारलं आहे. आता जिथे तुम्ही तिथे मी.” त्यावर नंदिनी मिश्कीलपणे विचारते, “म्हणजे आता तुम्ही गेस्ट रूममध्ये राहायला जाणार का?” यावर पार्थ स्पष्ट सांगतो की तो काव्याला आपल्या रूममध्ये, म्हणजेच ‘काव्यार्थ’च्या रूममध्ये घेऊन जाणार आहे. हा निर्णय ऐकताच जीवा आनंदाने शिटी मारतो. डिस्चार्जनंतर पार्थ काव्याला उचलून नेतानाचा सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे.

प्रोमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “आता जीवा-नंदिनीचीही लव्हस्टोरी दाखवा,” “Super एपिसोड… मेमरी लॉस नको होता,” “आता रम्या आणि आत्याला हाकला,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

आता पुढे जीवा आणि नंदिनी खरंच एकत्र येणार का? रम्याच्या कारस्थानांचा शेवट कधी होणार? आणि पार्थ-काव्याच्या नात्यात आणखी कोणते वळण येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ दररोज संध्याकाळी ७ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.