न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर डॉ अतुल सुराणा यांनी प्रसंगावधान राखत तातडीने सीपीआर (CPR ) देऊन त्याचा जीव वाचवला. डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. या घटनेमुळे डॉ सुराणा यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून नागरिकांनी त्यांना ‘देवदूत’ अशी उपमा दिली आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, संबंधित रुग्ण उपचारासाठी मांडवगण फराटा येथील आनंद हॉस्पिटलमध्ये आला होता. हॉस्पिटलमध्ये असतानाच तो अचानक बेशुद्ध पडला आणि त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ अतुल सुराणा यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णावर CPR अर्थात हृदय व श्वसन पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु केली.
डॉक्टरांनी योग्य वेळी आणि शास्त्रीय पद्धतीने CPR दिल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर करण्यात डॉक्टरांना यश आले. त्यानंतर अधिक उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णाला बारामती येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.
हि संपुर्ण घटना आनंद हॉस्पिटलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्ण बेशुद्ध पडल्यानंतर डॉक्टरांनी दाखवलेली जलद निर्णयक्षमता, वैद्यकीय कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तत्परता याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात वेळेवर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध झाल्यास गंभीर अवस्थेतील रुग्णाचाही जीव वाचू शकतो, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद
रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले
सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत