RTI चा गैरवापर करून ७० लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; शैक्षणिक संस्थेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): माहितीच्या अधिकाराचा (RTI) कथित गैरवापर, खोट्या तक्रारी, ई-मेलद्वारे बदनामी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत ७० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शरद वसंतराव फराटे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष यशवंत आडसूळ (रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांविरोधात विविध कार्यालये आणि विद्यापीठ स्तरावर खोट्या तक्रारी करणे, ई-मेलद्वारे बदनामीकारक माहिती पाठविणे, RTI च्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मागविणे आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देऊन दबाव टाकल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, या सर्व कारवाया थांबविण्याच्या बदल्यात आरोपीने तब्बल ७० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकाराला कंटाळून संस्थेने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत. शैक्षणिक संस्थांना धमकावून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत