शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमधील कुंभार आळी येथे स्वतंत्रदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. या वर्षीच्या ध्वजारोहणाचा मान ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिला तोफगोळा चालवणाऱ्या शिरूरचे वीरजवान राजेश गोपाळ यांच्या हस्ते संपन्न झाला.
भारत-पाक युद्धाच्या काळात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने केलेल्या पहिल्या प्रतिहल्ल्याचा ऐतिहासिक क्षण राजेश गोपाळ यांच्या रेजिमेंटने साधला होता. त्या हल्ल्यातील पहिला तोफगोळा पाकिस्तानच्या मुख्य लष्करी तळावर अचूकपणे लागला होता. या थरारक प्रसंगाच्या आठवणी त्यांनी उपस्थितांसमोर सांगितल्या तेव्हा वातावरणात क्षणभर दाट शांतता पसरली आणि सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
या कार्यक्रमात बोलताना कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार म्हणाले, “हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले घर, संसार, तरुणपण आणि प्राण अर्पण केले, तेव्हा आपणास हे अमूल्य स्वातंत्र्य लाभले. ते आपण प्राणपणाने जपले पाहिजे. सोहळ्यावेळी बालवाडीतील विद्यार्थ्यांना नितीन जामदार यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. छोट्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
या कार्यक्रमाला सेतू व्यवस्थापक शंकर जामदार,बाळासाहेब जामदार, दगडू त्रिमूखे, विजय शिर्के, संभाजी जामदार, राजकुमार जामदार, सुनील भावटणकर, संदीप कडेकर, संतोष जामदार, विनोद शिर्के, संजय कडेकर, विनायक जामदार, बाबुराव जामदार, सुनील शिर्के, विक्रम जामदार, दिपक शिर्के, राजेंद्र गोरडे, संजय राजापूरे, चरण जामदार, नितीन शिर्के तसेच अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देशभक्तीचा उत्साह, थरारक लष्करी आठवणी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत हा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.