पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरी आणि इतर जलस्रोत कोरडे पडतात. त्यामुळे गाव व वाड्यावस्त्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे काही वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल वाढले असून, त्वरित टँकरची सुविधा सुरू न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. , लवकर निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.