मुखईच्या शाळेत बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाचा सराव सुरु

शिरूर तालुका

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष सुरु होताच मुलांच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील शाळेचे अनेक विद्यार्थी बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या स्पर्धेत चमकले आहेत. यावर्षी नुकतेच बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्यासह मॉर्डन कॉलेजचे डायरेक्टर संतोष तांबे, मार्गदर्शक शुभम मुके, ज्ञानेश्वर काळे, शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किरण झुरंगे यांच्या उपस्थितीत खेळाच्या साहित्यांचे पूजन करत बेसबॉल खेळाच्या सरावाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी प्राथमिक आश्रमशाळेचे क्रीडाशिक्षक विष्णू सांगळे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, मनोज धिवार यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर व मॉर्डन कॉलेजचे डायरेक्टर संतोष तांबे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक मनोज धिवार यांनी केले तर प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी आभार मानले