शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे संकट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरे (NH548D) दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः धुळीच्या वावटळीतून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अलिकडच्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्याच्या मुरूमाच्या दबाईसाठी पाण्याचा वापर होत नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धूळ उडत असून, नागरिकांना सर्दी, खोकला, डोळ्यांची चीड व घशाच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

विशेषता दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असून,अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर धुळीचे लोट उठल्याने समोरून येणारी वाहने दिसेनाशी होतात. त्यामुळे अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. हा रस्ता काँक्रिटचा तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम करीत असलेल्या कंपनीने माळवाडी ते न्हावरे एवढा संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. अद्याप काँक्रिटीकरणाचे काम चालू झाले नसल्याने येथे मोठया प्रमाणावर धुळ उडते आहे.

रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ

रस्त्याच्या धुळीमुळे पिकांना त्रास होत असून, धुळीचे कण पानांवर जमा होऊन प्रकाशसंश्लेषण कमी करतात, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. तसेच, धूळ झाडांच्या छिद्रांमध्ये जमा होऊन वायूंची देवाणघेवाण कमी करते, ज्यामुळे पिकांची वाढ आणखीनच मंदावते याचा परिणाम पिकात रोगराई वाढून उत्पन्न घटते.

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष

नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसातून किमान ४-५ वेळा पाणी मारणे गरजेचे असताना प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात पाणी टाकले जाते. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत निखिल कन्स्ट्रक्शन चे जी.एम अनिल दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आम्ही पाणी मारत आहोत, मात्र नागरिकांचा त्रास लक्षात घेता पाणी मारण्याचे प्रमाण वाढवण्यात येईल. ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बाब आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर परिणाम होत असुन, ही गंभीर बाब आहे . संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून ठोस उपाययोजना न केल्यास जनतेचा उद्रेक होणे अटळ असुन तातडीने उपाययोजना न झाल्यास धुळीचा त्रास आंदोलनाच्या वनव्यात बदलण्याची शक्यता आहे.