शिरुर तालुका कृषि सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या अनेक मागण्या असुन त्या पुर्ण होताना दिसत नसल्याने संघटनेने विविध मागण्यांसाठी दि ५ मे पासुन काळ्या फिती लावून लोकशाही मार्गाने शिरुर तालुका कृषी कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन सुरु केले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे 

१) कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी.

२) कृषि सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करावे.

३) कृषि विभागामधील संपुर्ण कामकाज डिजिटल स्वरुपात होत असतांनाही कृषि सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही.

४) कृषि सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषि मदतनिस देणे बाबत (ग्रामस्तरावर समकक्ष असणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकाप्रमाणे मदतनिस मिळावा.)

५) निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देवुन सुध्दा त्यामध्ये सुसुत्रता येत नसुन, कृषि सहाय्यकांना वाहतुक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सुचनेमध्ये विविध योजनेत कृषि सहाय्यक यांना वाहतुक भाड्याची तरतुद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे. अन्यथा खरीप हंगाम २०२५ मधील निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल.

६) कृषि विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषि पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी व महसुल विभागाप्रमाणे आकृतीबंध करावा. कृषि सहाय्यक कृषि पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४ : १ या प्रमाणे करावे.

७) POCRA योजनेमध्ये समुह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी.

८) MREGS योजनेअंतर्गत लक्षांक देतांना क्षेत्रिय स्तरावरील अडचणीचा विचार करुन लक्षांक देण्यात यावे.

९) नैसर्गिक आपत्तीच्या पंचनामे करणे व तद्नंतर करावयाच्या कामाबाबत महसुल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या जबाबदाऱ्याबाबत योग्य न्यायसंगत कार्यपध्दती तयार करण्यात यावी.

१०) सिल्लोड तालुक्यातील कृषि सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर सदर प्रकरणाची विभागामार्फत चौकशी पूर्ण होवून सुध्दा संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी.

११) कृषि सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयक अडचणींची सोडवणूक करण्यात यावी.

अशा अनेक मागण्या असुन संघटनेने आंदोलनाचे टप्पे ठरवले आहेत

१) दि ५ मे २०२५ रोजी कृषि सहाय्यक काळ्या फिती लावून निषेध नोंदवून कामकाज करतील.

२) दि ६ मे २०२५ रोजी पासून कृषि सहाय्यक सर्व शासकीय What’s App गृपमधून बाहेर पडतील.

३) दि. ७ मे २०२५ रोजी सर्व तालुका कृषि अधिकारी कार्यालयासमोर कृषि सहाय्यक धरणे आंदोलन करतील.

४) दि. ८ मे २०२५ रोजी एक दिवस कृषि सहाय्यक सामुहिक रजेवर जातील.

५) दि. ९ मे २०२५ पासून सर्व Online कामकाजावर बहिष्कार टाकतील. यानंतरही कृषि सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास

६) दि. १५ मे २०२५ रोजी पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल.

शिरुर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर आज (दि ७) रोजी शिरुर शाखेने धरणे आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत दोरगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयवंत भगत, महिला जिल्हा कार्यकारिणी रोहिणी चौधरी, शिरुर तालुकाध्यक्ष संतोष गदादे, सचिव नंदु जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहायक सेवक उपस्थित होते.