करंदीत ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे फसला चोरीचा डाव

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या संदेश व पोलीस आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने फसला असून चोरटे पळून गेल्याची घटना घडली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील उद्योजक बाळासाहेब ढोकले यांच्या इमारतीच्या परिसरात काळ्या रंगाच्या आणि नंबर नसलेल्या स्कोर्पिओ मधून आलेले काही चोरटे रात्री दोनच्या सुमारास घुसले असल्याचे शेजारील पेट्रोलपंपाच्या सुरक्षा रक्षाला दिसले याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना संदेश दिला.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोलीस हवालदार शंकर साळुंके, विकास पाटील, होमगार्ड योगेश बधे, महेश साबळे पाटील यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेतली मात्र नागरिक जागे झाले असल्याची चाहूल लागल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेत स्कोर्पिओ मधून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मात्र यापूर्वी सदर इमारतीत चोरी होऊन लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडलेली असताना केवळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे करंदी सह परिसरातील सर्व ठिकाणचे नागरिक जागे झाले असल्याने चोरट्यांचा डाव फसला परिसरातील अन्य ठिकाणचा अनर्थ देखील टळला गेला आहे.

करंदी गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा काही दिवस बंद असताना मी स्वखर्चाने यंत्रणा कार्यन्वित केली असून गावामध्ये अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याबाबत पत्र देखील दिलेले आहे, ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे अनेक फायदे होत असून अन्य गावांनी देखील याचा विचार करावा असे पोलीस पाटील वंदना साबळे यांनी सांगितले.