शिरूर पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळेस विनापरवाना झांडाची कत्तल

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या आवारातील मोठमोठी वडाची झाडे मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीस खेळ चाले या उक्तीप्रमाणे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विनापरवाना तोडून त्याची गाडीतून नेऊन विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे ही झाडे बेकायदा तोडून चोरी केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अजित देसाई आणि यशवंत वाटमारे या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी लेखी निवेदनाद्वारे शिरुर नगर परिषद, शिरूर तहसिलदार, शिरूर पोलिस स्टेशन यांच्याकडे केली आहे.

शिरुर पंचायत समितीच्या आवारात सुशोभीकरणाच्या नावाखाली जुन्या सुमारे 80 ते 90 वर्ष वयाची दोन झाडे तसेच इतरही चार ते पाच झाडांची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता कत्तल करण्यात आली असुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई आणि कर्मचारी यशवंत वाटमारे यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरू लागली असून सदर ठिकाणी नगर परिषदेने पंचनामा केला आहे. १५ दिवस उलटूनही नगर परिषद मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्याकडून कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नाथाभाऊ पाचर्णे यांनी केला आहे.

रविवार (दि 5) रोजी मध्यरात्री 11:45 च्या दरम्यान शिरुर पंचायत समितीच्या आवारात सुमारे 80 ते 90 वर्ष वडाच्या झाडांची कत्तल चालु असताना सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पाचर्णे यांनी शिरुर पंचायत समितीच्या आवारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी गटविकास अधिकारी अजित देसाई आणि यशवंत वाटमारे हे उपस्थित होते. नाथा पाचर्णे यांनी संबंधित घटनेचे व्हिडिओ शूटिंग काढुन अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी पाचर्णे यांच्या अंगावर धावून जात त्यांचा मोबाईल हिसकाविन्याचा प्रयत्न केला.

या बेकायदेशीर रित्या केलेल्या वृक्षतोडीमुळे त्यावर अधिवास असलेल्या शेकडो पक्षांची घरटी ,अंडी व पिल्ले यांची हत्या झाली असल्याने सदर घटना पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक, निर्दयी तसेच निंदनीय आहे सदर वटवृक्षास दरवर्षी स्थानिक शेकडो महिला गेल्या अनेक वर्षापासून वटसावित्री सणाच्या दिवशी पूजा करत असतात त्यांच्याही धार्मिक भावना यामुळे दुखावल्या असून त्यामुळे महिलांमध्ये सदर घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या विषयी गटविकास आधिकारी अजित देसाई यांच्याशी संपर्क साधला असता मी सध्या कामात असून या विषयी मी नंतर फोन करतो असे उत्तर दिले.