ajit-pawar-amol-kolhe

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याची कबुली देत टिका केली होती. अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो. तर मग मी संसदेत अनुपस्थितीत होतो का…? प्रश्न मांडणं बंद केलं होतं का…? असे प्रत्युत्तर दिले.

पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, “अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं योग्य नाही, असं मी कायम बोलत आलो आहे. पण, अजित पवारांच्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (सुनील तटकरे) हे रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या प्रदेशाध्यक्षापेक्षाही माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही उजवी आहे.

 

तसेच राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यातील एकाही खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं मी ऐकलं नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच ज्या आमदारांच्या पाठिंब्यावर आपण उपमुख्यमंत्री झाला आहात. त्यांना निवडून आणण्यासाठी ‘शिवस्वराज्य यात्रा’ (shivswarajya Yatra) काढण्यात आली होती. त्या यात्रेची संकल्पना मी राबवली.

 

तसेच राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरु झाल्यानंतरही जयंत पाटील यांच्या मदतीनं शिवसंकल्प यात्रा आम्ही पूर्ण केली. विधानसभेचा निकाल आल्यानंतर तुम्ही (अजित पवार) माझं कौतुक केलं होतं. त्यामुळे भूमिका बदलल्यानंतर भाषा बदलते का…? तसेच तुमच्या पक्षात येण्यासाठी मला 10-10 वेळा निरोप कशाला पाठवले आणि लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…? असा सवालही कोल्हेंनी अजित पवारांना विचारला आहे.