शिरूरमध्ये कोयत्याच्या धाकाने मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर पोलिसांची तात्काळ आणि प्रभावी कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विशाल कृषी सेवा केंद्रामध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. शिरूर पोलिसांची ही वेगवान आणि प्रभावी कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

(दि. ५) एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विशाल कृषी सेवा केंद्र, शिरूर येथे दुकानमालक शिवम शिंदे काम करत असताना तिघा आरोपींनी दुकानात घुसून त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या संतोष पाचर्णे या कर्मचाऱ्याला मारहाण केली. आरोपी नामे परवेज उर्फ पाप्या पठाण, रूपेश चित्ते आणि ओंकार जाधव (सर्व रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर) यांनी दुकानात गोंधळ घालत शिवीगाळ केली.

पाप्या पठाण याने दुकानातील कात्रीने पाचर्णे यांच्या हातावर व पायावर वार करून त्यांना जखमी केले. त्याचवेळी रूपेश चित्ते याने कोयता हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण केली, परिणामी अनेक दुकानं बंद झाली व नागरिकांनी पळ काढला. यानंतर त्यांनी दुकानात परत येऊन संतोष पाचरणे यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखम केली. या घटनेबाबत संतोष पाचरणे (रा. जांभळी मळा, तर्डोबाची वाडी) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे करीत आहेत.या गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. अल्पावधीतच आरोपी परवेज पठाण (वय १९), रूपेश चित्ते (वय २२) आणि ओंकार जाधव (वय २६) यांना अटक करण्यात आली. यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता देखील जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक केंजळे म्हणाले की, “शहरात कोणीही घातक शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायद्याच्या कक्षेत कठोर कारवाई केली जाईल. ही कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप आणि पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचा समावेश होता. शिरूर पोलिसांची ही जलद व ठोस कारवाई स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.