रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run For Unity) या घोषवाक्याखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने “एकता दौड मॅरेथॉन” स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडलेल्या या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक, ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच, पोलीस मित्र, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य आणि पत्रकार अशा ४५० ते ५०० स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. मॅरेथॉनमध्ये २ कि.मी., ३ कि.मी. आणि ५ कि.मी. अंतरांच्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, माजी पंचायत समिती सभापती विश्वासराव कोहकडे, रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे तुषार पाचुंदकर व संदीप दौंडकर, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर राजाराम घावटे, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे अमित नवले तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संदीप कोकरे, डॉ. नरवडे, डॉ. अभय पडवळ, डॉ. अजित लांडे, डॉ. नळकांडे, डॉ. मदन नरवडे यांनी सहभाग नोंदवला. हिलिंग लाईव्ह (Healing Live NGO) तर्फे डॉ. निकिता तळेकर व संतोष सांबरे तर उद्योजक राजेश लांडे, नेताजी फंड, विक्रम पाचुंदकर यांनी सहभाग घेतला होता. महागणपती करिअर अकॅडमी, महागणपती करिअर फोरम, महागणपती स्कूल, गुरुकुल स्कूल, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना “राष्ट्रीय एकतेची शपथ” देण्यात आली आणि राष्ट्रगिताने मॅरेथॉनचा समारोप झाला. हा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे “एकता दौड मॅरेथॉन” हा उपक्रम एकतेचा आणि राष्ट्रभावनेचा सामर्थ्यवान संदेश देत संस्मरणीय ठरला. 

शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके