Satyawan Gajare

शिरूर तालुक्यात शेततळयात पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू…

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरूर) येथील शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत ऋषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. राजवंश व पती सत्यवान यांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या आईला वाचविण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जांबूत (पंचतळे) येथील बेल्हा-जेजूरी राज्य मार्गालगत शिवाजी गाजरे यांच्या मालकीचे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणी कुटूंबासह ते रहातात. रविवारी (ता. ३० ) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सत्यवान शिवाजी गाजरे (वय २५), पत्नी स्नेहल हे आपल्या राजवंश या दीड वर्षे वयाच्या लहान मुलासह शेतात होते. त्यांची नजरचुकवत खेळताना राजवंश हा स्विमिंग टँकमध्ये (तळ्यात) पडला.

वडील सत्यवान शिवाजी गाजरे याने चिमुकल्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने पती व मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, ती सुद्धा पाण्यात बुडू लागल्याने तिच्या ओरडण्याच्या आवाजाने किरण गाजरे, प्रविण गाजरे व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडत असलेल्या स्नेहल हिला बाहेर काढले. राजवंश व सत्यवान यांनाही बाहेर काढून आळेफाटा येथे उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, उपचारापूर्वीच दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केले.

या घटनेची माहिती कळताच जांबूत सह परिसरात शोककळा पसरली आहे. पिता पुत्राच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जांबूत (ता. शिरूर) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.