अळूच्या पानांबरोबरच अळू्च्या कंदाचा म्हणजेच अळकुडी /अरवीचा वापरही होतो. हा कंद पचायला जड, शरीराला पोषक, वातूळ आहे. आमसूल टाकून मीठाच्या पाण्यात उकडून तसाच खायला छान लागतो. उकडलेल्या अळकुड्या सोलून भाजी केली जाते. अशा या अळवाच्या कंदभाजीने जर अजीर्ण झाले तर तांदुळाचे धुवण म्हणजे तांदुळ धुतलेले पाणी हे औषध.
अळकुडी म्हटल्याबरोबर त्याच्याच जातकुळीतल्या बटाट्याची आठवण झालीच असेल. बटाटा ही सुद्धा कंदभाजी. मुळात भारतातील नाही. पोर्तुगीज आणि इंग्रजानी हा भारतात रुजवला. परंतु आज बटाट्याशिवाय सगळे अडते, अशी परिस्थिती होऊन बसलीय.
मग हा बटाटा नेमका आहे तरी कसा
बटाटा गुणाने गोड, पचायला जड, वातकफकर, जाडी वाढविणारा आहे.
लहान मुले इतर भाज्या खात नाहीत आणि बटाटा तेवढा आवडीने खातात, म्हणून पहिल्यापासून बटाट्याची भाजी, पराठा, चीप्स, वेफर अशी सवय मोठ्यांकडून लावली जाते. मुलांच्या या सवयी पुढे फारशा बदलत नाहीत. अगदी बरीच मोठी माणसे सुद्धा बटाट्याला प्राधान्य देतात. भाज्यांच्या किमती बघता बटाटा ज्यात त्यात घातल्याशिवाय पर्याय नाही असेही होते.
बटाट्याच्या अति वापराने स्थौल्य वाढीस लागते आणि स्थौल्याबरोबरीने येणारे आजार मागावून आपोआप येतातच. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने थोडा विचार करायलाच हवा ना
लहान मुलाना केवळ बटाट्याची सवय लावू नये. पराठे, भजी इ पदार्थ करताना केवळ बटाटा न वापरता इतर भाज्यांचा वापर युक्तीने करावा.
वेफर, potato chips इत्यादि स्वरूपात बटाटा तळून वापरला तर तो अजूनच पचायला जड. पाण्यात शिजवून वापरला, तर तळलेल्या बटाट्य़ापेक्षा जरा बरा. परंतु वारंवार आणि पूर्णपणे केवळ बटाट्याची भाजी खाणे टाळलेलेच बरे.
परंतु जर बटाटा भाजून शिजवला तर ? द्रव्य भाजल्यामुळे त्यातील जलांश कमी होऊन पचायला हलके होते, हा नियम आपल्याला माहितच आहे. चुलीमध्ये निखाऱ्यात बटाटे ठेवून भाजून खाण्याची मजा काहीनी नक्कीच घेतली असेल. हो. अगदी तस्साच बटाटा चुलीत भाजून त्याची भाजी त्यातल्या त्यात उत्तम. घरात grill वर भाजणे हाही पर्याय आहेच. पण हे सगळ्यांना शक्य नाही. ज्याला जमेल त्याने नक्की करावे.
(सोशल मीडियावरून साभार)