आपल्या आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गुढीपाडवा सणाच्या दिवशी आपण कडुलिंबाची दोन पान तरी खातो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
१) दातांच्या स्वच्छतेसाठी कडुलिंबाची काडी खूप उपयोगी आहे. याच्या नियमित वापराने दात स्वच्छ आणि निरोगी रहातात. तोंडाला दुर्गंधी येत नाही. श्वास फ्रेश रहातो. यामुळेच अनेक टुथ पेस्टमध्ये कडुलिंब वापरला जातो.
२) अनेक प्रकारचे त्वचा रोग कडुलिंबामुळे बरे होतात. अंघोळीच्या गरम पाण्यात कडु लिंबाची काही पाने टाकावी. कांजण्या, गोवर या आजारातदेखील फायदा होतो. चेहऱ्यावरील फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस लावावा. याचा अँटीसेप्टिक म्हणून उपयोग होतो.
३) पोटाचे विकार असल्यास सुमारे चमचाभर कडुलिंबाच्या रसात मध आणि मिरीपूड घालून प्यावे. पोटातील कृमी व जंत नाहीसे होण्यास मदत होते. रस जास्त घेऊ नये. काही जणांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.
४) घरात डास व इतर कीटक असल्यास छोटी शेकोटी करून त्यात कडुलिंबाची पाने टाकावी. याचा धूर सगळीकडे पसरू द्यावा. धान्य साठविताना त्यात कडुलिंबाची पाने टाकणे हा एक सुंदर पारंपारिक उपाय आहे. किडे, उंदीर, घुशी यापासून संरक्षण मिळते.
५) केसात कोंडा होणे, उवा होणे असा त्रास असेल, कडुलिंबाची पाने टाकून पाणी उकळावे. या पाण्याने केस धुवावेत. कोंडा कमी होतो. केसांचे आरोग्य सुधारते.