भारतीयांमध्ये चहा-कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण बेड टी घेण्याची सवय लावून घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी दिला आहे.
उपाशीपोटी चहा पिण्याचा ट्रेंड
डॉक्टरांच्या मते भारतात ‘बेड टी’ घेणे हा जणू एक ट्रेंड बनला आहे. मात्र ही सवय तात्काळ बदलण्याची गरज आहे, कारण यामुळे शरीरावर थेट नकारात्मक परिणाम होतात.
अॅसिडिटीचा धोका वाढतो
उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटातील अॅसिडिटी वाढते. चहा-कॉफीमध्ये असलेले कॅफीन हे अॅसिडिक घटक असल्याने पोटात जळजळ, आम्लपित्त आणि गॅसचा त्रास वाढू शकतो. विशेषतः अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी ही सवय टाळावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आयर्नच्या शोषणावर परिणाम
डॉक्टरांनी सांगितलेले दुसरे कारण अधिक गंभीर आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शाकाहारी लोकसंख्या असून, अनेकांमध्ये आयर्नची कमतरता आढळते. चहा-कॉफीमधील कॅफीन आयर्नच्या शोषणात अडथळा आणते. नाश्त्यासोबत किंवा उपाशीपोटी चहा घेतल्यास अन्नातील आयर्न शरीरात नीट शोषले जात नाही. परिणामी अॅनिमियाचा धोका वाढू शकतो.
आयर्न कमी असल्यास दिसणारी लक्षणे
आयर्नची कमतरता असल्यास अशक्तपणा, सतत थकवा, चेहरा व डोळे फिकट दिसणे, धाप लागणे अशी लक्षणे जाणवू शकतात.
मग चहा-कॉफी कधी प्यावी?
चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी थोडेसे काहीतरी खावे. त्यानंतर किमान 30 मिनिटांनी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटावर आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
(सोशल मीडियावरून साभार)