ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आरोग्य

बऱ्याच जणांच्या बाबतीत वारंवार असं होतं की थोडं काही खाण्यात कमी जास्त झालं किंवा जेवणाच्या वेळा चुकल्या की त्यांना लगेच ॲसिडीटी होते. छातीमध्ये जळजळ होते. करपट ढेकर येतात. घशात सतत आंबट पाणी येतं. काही जणांची ॲसिडीटी एवढी भयंकर वाढते की त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो. उलट्या होतात. असा वारंवार ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी सतत गोळ्या घेणं काही योग्य नाही म्हणूनच डाॅक्टरांनी सांगितलेले काही उपाय करून पाहा. यामुळे ॲसिडीटीचा त्रास कायमचा कमी होऊ शकतो, असं ते सांगत आहेत.

ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

डॉक्टरांनी काही घरगुती पेय घेण्याचा सल्ला दिला आहे. ते पेय नेमके कोणते ते पाहूया…

१) कच्ची पपई आणि कोरफडीचा ताजा गर हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्यांचा रस प्यायल्याने ॲसिडीटी कमी होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.

२) आल्याचा काढा प्यायल्यानेही ॲसिडीटी कमी होऊ शकते. आल्यामध्ये असे काही बायोॲक्टीव्ह घटक असतात जे पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात. शिवाय शरीरावर येणारी सूज कमी करण्यासाठीही आलं उपयोगी ठरतं. त्यामुळे आल्याचा काढा किंवा आलं घालून केलेला कोरा चहा प्यायल्याने ॲसिडीटी कमी होते.

३) बदामाचं दूध किंवा फुल फॅट दूध प्यायल्यानेही ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. ओट्सचं दूधही तुम्ही घेऊ शकता. त्यामुळेही पोटातलं ॲसिड कमी होऊन पचन चांगलं होतं.

४) याशिवाय केळी खाल्ल्यानेही ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. पण हे सगळे उपाय तुमच्या जवळच्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच करावे. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने प्रत्येकालाच हे उपाय लागू होतील असं नाही.

(सोशल मीडियावरून साभार)