अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

महाराष्ट्र राजकीय

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीवरून काही माध्यमांमध्ये पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक स्वरूपाची होती. त्यामुळे या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देणे हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे. पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी काही अदृश्य शक्तींकडून बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

माध्यमांनी कोणतेही वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थितीची खातरजमा करावी. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगवणे योग्य नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

‘मित्रपक्षांच्या भेटीचे राजकारण करू नका!’

दिल्लीतील भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी माध्यमांना स्पष्ट संदेश दिला. मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका. पेरलेल्या बातम्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक समजून घ्या, असे त्यांनी ठामपणे सांगितले.दिल्लीतील भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व आणि समन्वयाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना पक्षाने एकसंघ असल्याची भूमिका पुन्हा मांडली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत