केवळ प्रसाद म्हणून नाही. लक्ष्मीपूजन किंवा होळीला प्रसाद म्हणून आपण सर्वांत लहान पॅकेट घरी आणतो. कुणी खात नाही हो म्हणून कधी कधी टाकूनही देतो. परंतु या साळीच्या लाह्या किती औषधी गुणाच्या आहेत हे आपल्या लक्षात पण येत नाही.
चला बघू या आरोग्यदृष्टीने काय उपयोग आहे या साळीच्या लाह्यांचा
सालासकट तांदूळ भट्टीत भाजून फुलतात त्या साळीच्या लाह्या. सालरहित तांदूळ भाजले की त्याला चुरमुरे अथवा मुरमुरे म्हणतात. त्याचा शरीर- आरोग्यासाठी उपयोग नाही. साळीच्या लाह्या जठराग्नी वाढविणाऱ्या, पचायला हलक्या, कफदोष कमी करणाऱ्या, प्रमेह – लठ्ठपणा – मळमळ इत्यादी विकार कमी करणाऱ्या आहेत. लाह्या फुललेल्या असतात. त्यामुळे शरीरात वाढलेले मेद, कफ यांचे शोषण करतात. पचायला हलक्या असूनही बल देणाऱ्या आहेत. अनेक आजारात पथ्यकर आहार स्वरूपात लाह्या विविध रूपात घेण्यास सांगितले आहे.
उदा. ताप असेल, तर लाह्या चौदा पट गरम पाण्यात भिजवून त्यात थोडेसे सुंठ, पिंपळी चूर्ण टाकून प्यावे, याला पेया म्हणतात. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. घाम येऊन ताप कमी होतो; शिवाय शरीरात डिहायड्रेशन होत नाही. वांती ( उलटी), मळमळ, पित्त पडत असेल तर लाह्याचे पीठ करून मधासह चाटण उपयोगी आहे. वारंवार तहान लागत असेल आणि पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर लाह्याचे पीठ साखर व मध पाण्यात टाकून घ्यावे.
अतिसार ( जुलाब ) होत असेल तर, लाह्या उपयोगी आहेत; कारण अतिसारमुळे कमी झालेली पचनशक्ती लाह्यामुळे वाढते, पचायला हलक्या असल्याने त्रास होत नाही; शिवाय लाह्या ग्राही शोषण करणाऱ्या असल्याने अतिसार थांबविणाऱ्या आहेत. गर्भावस्था असल्यास मळमळ, उलटी असे त्रास सहसा होतात. त्यावर पाण्यात साळीच्या लाह्या घालून प्यावे. गर्भिणीला अशक्तपणादेखील जाणवत नाही. लहान बाळांना पुष्टकर आहार म्हणून लाह्यांचे सातू व दूध, खीर स्वरूपात उपयोगी आहे. लाह्या मेद कमी करणाऱ्या आहेत. त्यामुळे स्थूल व्यक्तीला खूप उपयोगी आहे. मेदाचे शोषण करतात आणि अशक्तपणा न येता वजन कमी होते.
अनेक रीसर्च पेपर लाह्यावर लिहिले गेले आहेत. त्यावरून लक्षात येते की, आयुर्वेदात लिहिलेले लाह्याचे वर्णन किती योग्य आहे. लाह्या कोणत्या स्वरूपात घेतल्या तरीही उपयोगीच. खीर लाडू स्वरूपात पुष्टकर, पेया स्वरूपात घेतल्या तर ज्वरहर अग्निवर्धक, नुसत्या भाजून खाल्ल्या तर स्थौल्यहर. अशा या साळीच्या लाह्या प्रत्येक घरी नक्की असाव्या. केवळ प्रसाद म्हणून नाही तर आहारद्रव्य स्वरूपात.
(सोशल मीडियावरून साभार)