हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे

आरोग्य

जसा जसा ऋतू बदलत जातो तसा तसा त्याचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत जातो. ऋतू बदलला की त्वचेची, आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलते. तसाच बदल आपल्या आहारामध्येही होतो. आता हेच पाहा ना. सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत त्वचा काेरडी पडणे, तळपायांना भेगा पडणे, अंगाला खाज येणे, केस गळणे, कोंड्याचं प्रमाण वाढणे, कॉन्स्टिपेशन असे कित्येक त्रास डोकं वर काढू लागतात. हे त्रास कमी करायचे असतील तर आहारात थोडा बदल करायला हवा त्यासाठी हिवाळ्यात सुपरफूड मानले जाणारे कोणते पदार्थ प्रत्येकानेच आवर्जून खायला हवे, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायलाच हवे

1) बाजरी

ऋजुता दिवेकर सांगतात की बाजरी हिवाळ्यात खायलाच हवी. भाकरी, बाजरीचा भात, लाडू अशा कोणत्याही पदार्थाच्या माध्यमातून बाजरी खाऊ शकता.

बाजरी तुमच्या हाडांसाठी, मेंदूसाठी खूप फायदेशीर असून केस गळणं कमी करण्यासाठीही बाजरीचा फायदा होतो. हिमोग्लोबिन कमी झालं असेल, एनर्जी थोडी कमी झाली असेल तरीही बाजरी तुम्हाला पुन्हा नक्कीच रिफ्रेश करू शकते.

2) उंदियाे

दुसरा पदार्थ आहे उंदियाे. गुजरातमध्ये या दिवसांत उंदियो घरोघरी करून खाल्ला जातो. वेगवेगळ्या डाळी आणि या दिवसांत मिळणाऱ्या ताज्या भाज्या यांच्या मिश्रणातून उंदियो तयार होतो

त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उंदियो खायला हवा. हे एक उत्तम प्री- बायोटिक आहे. त्यामुळे पचन, मेटाबॉलिझम चांगले होण्यासाठीही त्याची मदत होते.

उंदियो बनवण्याची प्रोसेस

1) मुठिया तयार करा – मेथी, पीठ, मसाले मिसळून छोटे गोळे करून हलके तळून ठेवा.

2) मसाला वाटा – खोबरे, मिरची, आले, लसूण, मसाले एकत्र वाटा.

3) भाज्या कापा – सगळ्या भाज्या मध्यम आकारात कापा.

4) भाज्यांत मसाला भरा – वांगी, कांदे, केळी यामध्ये थोडा मसाला भरा.

5) कुकर / मोठ्या भांड्यात – तेल गरम करून आधी कडक भाज्या, मग बाकी भाज्या घाला.

6) मसाला + मुठिया घाला – वरून उरलेला मसाला आणि मुठिया टाका.

7) शिजवा – मंद आचेवर झाकण ठेवून वाफेत शिजू द्या. ढवळू नका.

8) शेवटी – लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर घाला.

3) खोबरं

हिवाळ्यातलं एनर्जी बुस्टर म्हणजे सुकं खोबरं. खोबरं खाल्ल्यामुळे अंगात ताकद तर येतेच. पण त्वचा आणि केस देखील अधिक चांगले होतात. त्यांचा काेरडेपणा कमी होतो. त्यामुळे खोबऱ्याचा एक तुकडा दिवसभरातून कधीही एकदा बारीक चावून नक्की खा. दातांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)