शिंक का येते 

आरोग्य

खरे तर शिंक म्हणजे नाकात किंवा घशाच्या मार्गात चुकून एखादा चुरचुर करणारा कण गेला असेल, तर त्याला बाहेर काढण्यासाठी शरीराने दिलेली प्रतिक्रिया असते. शिंक येण्याची क्रिया पूर्णपणे अनैच्छिक असते. कुठलीही पूर्वसूचना नसताना अचानक घडणार्‍या या क्रियेत अक्षरशः क्षणार्धात कमालीच्या वेगाने हवा नाकातून बाहेर फेकली जाते. चारचौघात अशा सटासट येणार्‍या शिंकानी थोडेसे लाजल्यासारखे जरूर वाटते; पण एरवी निरुपद्रवी असणार्‍या या शिंका शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीचे गमक असते. शिंका येण्याची क्रिया श्‍वसन करणे, वास घेणे याप्रमाणेच, आपण जी हवा श्‍वासावाटे आत घेतो ती स्वच्छ करणे हेदेखील आपल्या नाकाचे एक कार्य असते. यासाठी श्‍वासाबरोबर जे धूलीकण, काही इतर पदार्थांचे सूक्ष्म कण, जंतू, विषाणू अशा गोष्टींना नाकातच रोखणे आवश्यक असते.

नाकापासून घशापर्यंत असलेल्या आतल्या अस्तरावर काही मज्जातंतू असतात. या मज्जातंतूंच्या टोकावर संवेदना ग्रहण करणारे विशेष प्रकारच्या पेशी असतात. शरीराला अपायकारक अशा कणांचे श्‍वासाबरोबर नाकात आगमन झाल्यावर, या पेशींमध्ये एक चुरचुर करणारी संवेदना निर्माण होते. मानवी मेंदूमध्ये एक शिंकांचे केंद्र असते. नाकातील मज्जातंतू चुरचुर करणार्‍या या संवेदनेचा निरोप या केंद्राकडे पोहोचवतात. या निरोपाची प्रतिक्रिया म्हणून या केंद्राद्वारे फेशिअल नर्व्ह नावाच्या विशेष मज्जातंतूला त्वरित उद्दीपित केले जाते. ही फेशिअल नर्व्ह चेहरा, डोळे, नाक यांच्याबरोबर फुफ्फुसे आणि श्‍वासपटलाच्या हालचाली नियंत्रित करत असते.

फेशियल नर्व्ह उद्दीपित झाल्यावर तिच्या योगे, डोळ्यांतून पाणी वाहू लागते, ते मिटतात. नाकातील आतल्या अस्तरावर एक द्रव पदार्थ पाझरू लागतो. श्‍वासपटल वेगाने वरच्या बाजूला सरकते आणि तोंडाचा आ वासला जाऊन वेगाने श्‍वास आत खेचला जातो. त्यामुळे फुफ्फुसातील हवेवर प्रचंड दाब निर्माण होतो. त्याक्षणी ती हवा फुफ्फुसातून कमालीच्या शीघ्र गतीने आणि दबावाने नाकातोंडातून बाहेर पडते. हे होत असताना एका झटक्यात डोके मागे खेचले जाते आणि ’आक्च्छी’ असा आवाज येतो. या सर्व क्रिया शिंका येताना निमिषार्धात घडतात.

कारणे

शिंका येण्याला कारणीभूत म्हणजे धूलीकण. एखादा तीव्र वास, काही स्प्रे, परागकण, सर्दी किंवा फ्लूचे विषाणू अशा असंख्य गोष्टी असू शकतात. तसेच आपल्या शरीराला वावडे असणार्‍या गोष्टी व जंतुसंसर्गदेखील शिंका यायला कारणीभूत ठरू शकतात.

अ‍ॅलर्जी

शरीरात घुसणार्‍या काही गोष्टी किंवा जंतूंना काही व्यक्तींचे शरीर अतिसंवेदनशील असते. उदा. परागकण. धूळ वगैरे. या गोष्टी आपल्या शरीराच्या संपर्कात आल्यावर, शरीराकडून दिल्या जाणार्‍या विशेष प्रतिक्रियेला अ‍ॅलर्जी म्हणता येईल. ही प्रतिक्रिया आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधीत असते. साधारणपणे शरीराला त्रासदायक नसलेल्या गोष्टींविरुद्ध काही घडत नाही; पण एखादा त्रासदायक जंतू, विषाणू जर आपल्या शरीरात जात असेल तर अशी शिंकांची प्रतिक्षिप्त क्रिया घडवून प्रतिकारशक्ती त्यांना चक्क हाकलून देऊ शकते.

जंतुसंसर्ग 

सर्दी व्हायला कारणीभूत असे तब्बल शंभर प्रकारचे विषाणू (व्हायरस) असतात. हे श्‍वासावाटे नाकात गेल्यावर शिंका येतात आणि सर्दी होते. त्याचप्रमाणे फ्लू, स्वाइन फ्लूचे विषाणू शरीरात प्रविष्ट झाल्यावर शिंका येतात. प्रत्येक शिंकेमध्ये चाळीस हजार द्रवकण असतात. यातून हे विषाणू शरीराबाहेर फेकले जातात. त्यामुळेच फ्लू, स्वाइन फ्लू यांचा रोगप्रसार रुग्णांच्या शिंकातून होतो.

इतर कारणे

हवेत बदल झाला, एअर कंडिशनरची खूप थंड हवा लागली, खूप थंड पाणी, शीतपेये, बर्फ, आईस्क्रीम खाल्ले, तपकीर ओढली, मिरच्यांचा धुरळा उठला की शिंका येतात. काही औषधे बंद केल्यावर शिंका येऊ लागतात. क्वचित प्रसंगी नाकाला जखम झाल्यावरसुद्धा शिंका येतात असे आढळून येते. लहान वयात, पौगंडावस्थेत या आजाराचा त्रास जास्त होताना आढळतो. ज्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना असा आजार असतो, त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

उपचार

शिंक ही शरीरात शिरलेले त्याज्य पदार्थकण बाहेर फेकत असल्याने त्याचा उपचार करण्याची गरज नसते; परंतु सार्वजनिक कार्यात काम करणार्‍या व्यक्तींना शिंका सतत येत राहिल्यास अवघडल्यासारखे होऊ शकते. अशा प्रसंगी औषधोपचार करावा लागतो.

प्रतिबंधक उपायात ज्या गोष्टींनी शिंका येतात त्या टाळणे महत्त्वाचे असते. ज्यांना धुळीचा त्रास होतो त्यांनी जाजमे, पडदे स्वच्छ ठेवणे, स्वतः धुळीत काम न करणे जसे महत्त्वाचे आहे तसेच धुळीशी निगडित काम करावे लागत असेल उदा. घर किंवा अंगण झाडून काढणे, तर नाकाला स्कार्फ किंवा फडके बांधावे. ज्यांना जंतुसंसर्गाचा त्रास होत असेल अशांनी त्यावर डॉक्टरी सल्ल्याने उपचार करणे आवश्यक असते. ज्यांना थंड हवेचा त्रास होतो त्यांनी त्याला सामोरे जाऊ नये.

बाजारात मिळणारी अ‍ॅण्टिहिस्टॅमिनिक वर्गातील औषधे परस्पर दुकानातून घेऊन तात्पुरता इलाज करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. घरगुती उपचार करायला हरकत नाही; पण त्यामुळे मूळ त्रास बाजूला राहण्याची शक्यता असते. ज्यांना अ‍ॅलर्जी आहे त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे याच्या शास्त्रशुद्ध तपासण्या करू न उपचार घ्यावेत. त्यानुसार ज्या गोष्टींचा त्रास आहे, त्याच गोष्टीतील सूक्ष्म कणांपासून बनवलेले सौम्य स्वरुपातले इंजेक्शन घेतल्यास हे त्रास कमी होऊ शकतात.

ज्या व्यक्तींना विषाणू संसर्गामुळे शिंका येत असतील, त्यांनी त्वरित औषधोपचार करावा. स्वाइन फ्लूसारख्या आजारात तर ही उपाययोजना वेळ न दवडता केली तर पुढील गंभीर त्रास टळू शकतो. शिंका आल्यावर अ‍ॅण्टिबायोटिक्स घेण्याची अजिबात गरज नसते. त्याऐवजी ताप असल्यास तो कमी करणारी औषधे, नाकात फवारण्याचे नेझल स्प्रे, अ‍ॅण्टिव्हायरल औषधे, पूर्ण विश्रांती घेणे जास्त महत्त्वाचे असते.

(सोशल मिडीयावरून साभार)