गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेचा मृत्यू

आरोग्य महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने 28 वर्षीय आयशा समीर मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधे घेतली. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र रक्तस्राव न थांबल्याने त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे सुमारे दहा दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांचे काय म्हणणे?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या केवळ ठरावीक कालावधीतील गर्भधारणेसाठी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच सुरक्षित असतात. चुकीचा कालावधी, अपुरी वैद्यकीय तपासणी किंवा चुकीचे डोस घेतल्यास अतिरक्तस्राव, संसर्ग, अपूर्ण गर्भपात आणि जीवघेणा शॉक यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

ग्रामीण भागात सामाजिक दबाव, गोपनीयतेची भीती किंवा माहितीअभावी अनेक महिला थेट मेडिकलमधून औषधे खरेदी करतात. काही ठिकाणी बेकायदेशीर विक्री होत असल्याच्याही चर्चा आहेत.

कायदेशीर तरतुदी आणि जागरूकतेची गरज

भारतात कायद्याने ठरावीक अटींनुसार सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय औषधे घेणे जीवघेणे ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण भागातील आरोग्यजागरूकतेचा गंभीर प्रश्न अधोरेखित करणारी आहे.