महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश
ठाणे : ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला दिले. प्रकल्पावरील आक्षेप समजून घेऊन ते तातडीने सोडवण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यासही त्यांनी सांगितले.
१२,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात २६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीवरून, तर नवीन आणि जुन्या ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारा ३ किलोमीटरचा मार्ग भुयारी असणार आहे. प्रकल्पाचे सुमारे ९.५ टक्के काम पूर्ण झाले असून मेट्रो स्थानके आणि कास्टिंग यार्डचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग रायलादेवी येथे मेट्रो-४ आणि बाळकुम नाका येथे मेट्रो-५ शी जोडला जाणार आहे.
बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी समता नगर, लोकमान्य नगर, आई माता मंदिरमार्गे शिवाई नगरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याची मागणी केली. या पर्यायी मार्गाचा तीन आठवड्यांत अभ्यास करून नागरिकांना अधिक लाभदायी आणि कमी बाधित करणारा पर्याय सादर करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
ईडन वूड्स, हिरानंदानी इस्टेट आणि चेंदणी कोळीवाडा परिसरातील नागरिकांचे आक्षेप तातडीने सोडवण्यासही त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवात प्रकल्पाची माहिती देणारे फलक लावून जनजागृती करावी तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करावीत, असे निर्देशही महारेलला देण्यात आले.
ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करून प्रवास सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भर दिला.