डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

महाराष्ट्र

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शिक्षण संस्था उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि चिरस्मरणीय राहील.

त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्यांचे पालन करत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सार्वजनिक जीवनात साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजहिताची भूमिका त्यांनी कायम जपली, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी, समाजसेवक आणि अनुभवी सार्वजनिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत