‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

राजकीय

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत, मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, असे स्पष्ट केले. तसेच आगामी काळात पुण्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी स्वतः अधिक वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे उपसभापती झाल्यानंतर सोमवारी प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या अहिर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहर प्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, अजय भोसले, उपनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहिर म्हणाले, “उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळतानाही राजकीय मर्यादा पाळून पक्ष संघटनेसाठी सक्रिय राहणार आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी देऊन उपेक्षित घटकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.”

यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबतही भूमिका मांडली. “सुषमा अंधारे यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या सामाजिक चळवळींशी जोडलेल्या कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय मिळावा, याची काळजी पक्षाने घेतली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, पुणे दौऱ्यात सचिन अहिर यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्व्हर रॉक्स’ निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेटही घेतली.