मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये नाही, असा घणाघात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या चर्चासत्रात ते बोलत होते.
सिन्हा यांनी सरकारच्या विकासदराच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारताचा प्रत्यक्ष विकासदर सरकार सांगत असलेल्या ७.७ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा केला. वाढती महागाई, घटती गुंतवणूक, शेतकऱ्यांवरील संकट, रुपयाचे अवमूल्यन आणि देशातून बाहेर जाणारी गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनल्याचे त्यांनी सांगितले. “२०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट सध्याच्या परिस्थितीत साध्य करणे कठीण आहे,” असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण कुमार यांनी नोटबंदी आणि जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे सांगितले. वाढती बेरोजगारी, घटती क्रयशक्ती आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील अपुरी गुंतवणूक यामुळे सामाजिक व आर्थिक समस्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ होते. देशातील आर्थिक प्रश्नांवर राजकारण केंद्रित होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारवर टीका केली.या चर्चासत्राला पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.