मुंबई: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि अध्यापकांना अधिक संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे येथे आयोजित या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थी केवळ अभ्यासाच्या ताणाखाली नसून सामाजिक अपेक्षा, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि भावनिक एकाकीपणासारख्या समस्यांनाही सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
‘मानससूत्र’ हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून शिक्षकांच्या संवेदनशीलतेला नवी दिशा देणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील मानसिक तणावाची लक्षणे ओळखणे, आत्महत्येच्या प्रवृत्तीची प्रारंभिक चिन्हे समजून घेणे, समुपदेशन व मार्गदर्शन करणे तसेच आवश्यकतेनुसार योग्य रेफरल प्रणाली विकसित करणे या विषयांवर या प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संकटपरिस्थितीत तत्काळ आणि संवेदनशील प्रतिसाद देण्यासाठी अध्यापकांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अध्यापकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढेल तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्याबाबत सजगता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.