महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील गैव्यवहाराची महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करा; विजय वडेट्टीवार 

महाराष्ट्र

मुंबई: एस. टी कामगारांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली.

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे. यामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे.कर्जाचे व्याजदर ९ टक्के व १४ टक्के वरून ७ टक्के इतके कमी करण्याचा ठराव बँकेने घेतला. या ठरावामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे भारतीय रिझर्व बँकेने १५ सप्टेंबर २०२३ च्या पत्रान्वये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेला निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या पत्रापूर्वीच सहकार विभागाने लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे. त्यामुळे चौकशीचा कालावधी कमी करून एक महिन्याच्या आत किंवा पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून कारवाईची मागणी करीत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी प्रशासक नेमण्याची विनंती केली.