गुजरातीबहुल मतदारसंघातील मराठी चेहरा; रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने तावडे यांची निवड निश्चित झाली. तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेच्या ताब्यातील महापौरपद भाजपकडे गेले आहे.

घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे या गुजरातीबहुल मतदारसंघातून निवडून आलेल्या मराठी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महापौरपदासाठी खुला प्रवर्ग (महिला राखीव) असल्याने भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा होती. मात्र अखेर पक्षाने तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

राजकीय पार्श्वभूमी

रितू तावडे यांनी २०१२ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या महापालिकेत निवडून आल्या. त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासह उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भाजप महिला मोर्चात विविध पदांवर काम करत त्यांनी संघटनात्मक कामकाजातही सक्रिय भूमिका बजावली आहे. सहारा जनरल कामगार कर्मचारी संघटनेच्या त्या संस्थापक आहेत.

अंतर्वस्त्र विक्री दुकानांबाहेर लावण्यात येणाऱ्या अर्धवस्त्रधारी पुतळ्यांविरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. वीजदरवाढीविरोधात आंदोलन तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात बालकामगारांचा वापर होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.

मराठी अस्मिता आणि राजकीय समीकरण

मुंबई महापालिका निवडणूक मराठी अस्मितेच्या मुद्यावर रंगली होती. “मुंबईचा महापौर मराठीच असावा” ही भूमिका अनेक पक्षांनी प्रचारसभांमध्ये मांडली होती. महायुतीनेही मराठी-हिंदू महापौर देण्याचा शब्द दिला होता. अशा पार्श्वभूमीवर महिला आणि मराठी असा दुहेरी निकष साधत भाजपने तावडे यांची निवड केली. त्याचबरोबर गुजरातीबहुल मतदारसंघातील प्रतिनिधित्व कायम ठेवत राजकीय समतोल राखल्याचेही मानले जात आहे.

मोठी आव्हाने समोर

गेल्या चार वर्षांत महापालिका निवडणूक न झाल्याने प्रशासनाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. आता नव्या महापौरांसमोर अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी, प्रदूषण, फेरीवाल्यांचा प्रश्न, फुटपाथ अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, हॉस्पिटल्सची अवस्था आणि सुरू असलेली मोठी बांधकामे ही प्रमुख आव्हाने असणार आहेत.

शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे हे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. विरोधी बाकांवर माजी महापौर आणि अनुभवी नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने राजकीय पातळीवरही तावडे यांची कसोटी लागणार आहे.

तावडे यांची प्रतिक्रिया

निवडीची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या, “४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर विराजमान होत आहे. मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आहे. गेल्या २५ वर्षांतील कारभाराला पर्याय म्हणून हा कौल मिळाला आहे. मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

मुंबईच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या महापौरपदाची जबाबदारी आता रितू तावडे यांच्या खांद्यावर आली आहे. आगामी काळात त्या प्रशासन आणि राजकीय आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जातात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.