महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब…

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजीही राज्यसरकारने घ्यायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही फक्त पुढील काळात काय करायचे याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांचे साधारण दोन – दोन नेते समितीत काम करतील. यासोबतच इतर सर्व मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप सीबीआयच्या कारवाईनंतर खरे ठरत आहेत. भाजप त्यावेळी समीर वानखेडे यांचे समर्थन करत होते त्यावरुन भाजपचा स्वभाव समजतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. राज्यात आदरणीय शरद पवारसाहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. त्यामुळे या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला लगावतानाच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याच्या सरकारने पूर्णपणे निराशा केली आहे. हे सरकार असंवेदनशीलपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी वागले आहे. शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीही झालेली नाही. सरकारने सभागृहात बऱ्याच घोषणा केल्या. मात्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी विरोधी पक्षाने अधिवेशनादरम्यान सभागृहात मागणी केली होती. आज पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी सभागृह सुरु नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

मला ईडीची पुन्हा नोटीस आलेली नाही. त्यामुळे काहीही संभ्रम निर्माण करु नका. वेळ वाढवून मागितला आहे. ईडीचे कार्यालय आमच्या पक्षाच्या कार्यालयाच्या मागे आहे. त्यामुळे मी ठरलेल्या वेळेत जाणार आहे .त्यानंतर नेमकी कशासाठी नोटीस बजावली आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.