मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर मराठी अस्मितेवर केलेला उघड प्रहार होता. तत्कालीन सत्ताधीश स. का. पाटील आणि मोरारजी देसाई यांनी अशा गर्विष्ठ वक्तव्यांद्वारे महाराष्ट्राच्या भावनांना आव्हान दिले होते.
मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का बसला की तो तीव्रपणे उभा राहतो, हे त्यांनी दुर्लक्षित केले. या पार्श्वभूमीवर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या धारदार लेखणीद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रखर टीका केली. त्यांच्या व्यंगातून दिल्लीपर्यंत मराठी जनतेचा आवाज पोहोचला.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांनी “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे” अशी भूमिका मांडली; मात्र त्यांच्या विधानातील ठामपणा अभावाने अत्रे यांनी त्यांच्यावरही उपरोधिक टीका केली. “तुमच्या ‘चव्हाण’ मधला ‘च’ काढला, तर उरतं तरी काय?” या शब्दांत त्यांनी राजकीय सौम्यतेवर प्रहार केला.संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ भाषिक राज्याची मागणी नव्हती, तर स्वाभिमान आणि ओळखीची लढाई होती. मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. हुतात्मा चौक हे त्या संघर्षाचे जिवंत प्रतीक बनले.
या बलिदानातून एकच घोषणा घुमत राहिली — “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!”आज महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. मुंबई महाराष्ट्राला दान म्हणून मिळालेली नसून ती संघर्ष, त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली आहे.मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर मराठी अस्मितेच्या लढ्याचे जिवंत प्रतीक आहे.