मुंबई: विधानसभेत विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हमरीतुमरी सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. पण, ठाकरे आणि शिंदेंचे आमदार हे अनेकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच विधानसभेतील वादानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विधिमंडळ परिसरात येत होते. पण, तिथे अगोदरच पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांना पाहून आदित्य ठाकरे यांनी डिवचलं आहे.
खरेतर विधानसभेत आमदार वरूण सरदेसाई, आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना घेरलं होतं. त्यावेळी देसाई यांच्याबाजूनं मंत्री गुलाबराव पाटील आणि इतर शिंदे गटाचे आमदार धावून आले. तेव्हा, सभागृहात ठाकरे विरुद्ध शिंदे गट, असा जोरदार राडा झाला. यानंतर आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधिमंडळातील कार्यालयात भेट घेतली. भेटीनंतर आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी येत होते.