मराठा आरक्षणासाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन…

महाराष्ट्र

औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजाला मिळालेलेे SEBC आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२० मध्ये रद्द केले होते यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. यापार्श्वभूमीवर छ. संभाजीनगर शहरातील सकल मराठा समाजाची शनिवारी सायंकाळी जिजामाता कन्या विद्यालयात बैठक झाली.

या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी राज्यशासनाविरोधात १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणीही राज्यसरकाशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला येथे येण्यास भाग पाडावे, असे यावेळी ठरले.