मुंबई: चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखान्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाल्याच्या घटनेवर विधानसभेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रशासकीय अनास्था आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
चंद्रपूर येथील सिमेंट कंपनीतील अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरमधील अशाच घटनेप्रमाणे या जखमी कामगारांनाही किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ आश्वासने न देता ठोस मदत देण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी लक्षवेधीद्वारे मांडली.
या अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कारखान्यातील त्रुटींकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्राथमिक चौकशीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे, तर कारखान्याच्या मालकावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
धोकादायक रसायने आणि यंत्रसामग्री हाताळणाऱ्या उद्योगांची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावर विशेष पथक स्थापन करावे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. कारखान्यात सुरक्षा अधिकारी नियुक्त होता का? असल्यास त्याने कर्तव्यात कसूर का केली? याची सखोल चौकशी व्हावी, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
सरकारला धारेवर धरताना त्यांनी सवाल केला की, नागपूर जिल्ह्यातील अपघातांना मिळणारा न्याय चंद्रपूरला का मिळत नाही? चंद्रपूरची जमीन, पाणी, दगड आणि कष्टकरी कामगारांचा वापर करून कंपन्या नफा कमावत आहेत; मात्र कामगारांच्या जीवाची किंमत शून्य मानली जात आहे. या कामगारांचा वाली कोण? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर संबंधित मंत्र्यांनी जखमी कामगारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणी चंद्रपूर येथे बैठक घेण्यात येणार असून कामगार कायद्यात आवश्यक बदल सुचवण्यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल, अशी माहितीही मंत्र्यांनी विधानसभेत दिली.