पुनमनगर येथील पीएमजीपीच्या १७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने तात्काळ करावा

महाराष्ट्र

मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.

येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. धोकादायक म्हणुन घोषित झालेल्या या १७ इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. परंतु याला तीन वर्ष उलटली तरी या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. या सर्व इमारती सी-१ कॅटॅगरीतील आहेत.

त्यामुळे त्याचा पुनर्विकास तातडीने होणे आवश्यक आहे. या इमारतींच्या पुनर्विकासाचे टेंडर म्हाडाने काढावे. म्हाडाने काॅन्ट्रक्टर म्हणून यात सामिल व्हावे, अशी सुचना वायकर यांनी यावेळी केली. या ठिकाणी कुठलीही मोठी जिवितहानी अथवा दुर्घटना घडण्यापुर्वी म्हाडाने या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी वायकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.