पुणे: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या परवानगीशिवाय चोरुन तिचा व्हिडिओ काढल्याबद्दल महिलेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती आहे. खराडी येथील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यावर छापा टाकून ७ जणांना पकडले होते. त्यांच्याकडे कोकेन सापडले होते. प्रांजल खेवलकर याचा त्यात समावेश होता. प्रांजल खेवलकर याच्याकडील मोबाईलमध्ये असंख्य अश्लिल व्हिडिओ आणि फोटो आढळून आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेल्या अश्लिल व्हिडिओ व फोटोची माहिती दिली होती.
पोलिसांनी त्यातील काही फोटो, व्हिडिओ वरुन त्यातील महिलांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी ४ महिलांकडे चौकशी करण्यात आली होती. एका महिलेने आपले हे व्हिडिओ चोरुन काढले असल्याचे सांगितले. या महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी आय टी अॅक्ट ६६ ई, बीएनएस ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे