दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे स्व. अरुण सरनाईक यांच्यावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत होणार आहे.हा माहितीपट शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी (लघु नाट्यगृह), मुंबई येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सुवर्णकाळ गाजवणारे कलाकार
१९६० ते ७० च्या दशकात आपल्या अभिनय आणि गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अरुण सरनाईक हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक राजबिंडे आणि बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘मुंबईचा जावई’, ‘केला इशारा जाता जाता’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना चार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
कन्येकडून वडिलांना भावपूर्ण आदरांजली
अरुण सरनाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांची कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. दुर्मिळ छायाचित्रे, दस्तऐवज, आठवणी आणि वैयक्तिक संवादांच्या माध्यमातून या माहितीपटात सरनाईक यांच्या कलात्मक वारशाचा प्रभावी आढावा घेण्यात आला आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन डॉ. संतोष पाठारे यांनी केले आहे.या विशेष प्रदर्शनास सिनेप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी केले आहे.
कधी : २७ फेब्रुवारी २०२६
वेळ : दुपारी ३ वाजता
स्थळ : लघु नाट्यगृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई
वृत्तनिवेदन : जनसंपर्क विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई