परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

महाराष्ट्र

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये नोकरीच्या आमिषाने नेल्यानंतर एका महिलेवर शरीरविक्री करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह पीडित महिलेने या कथित रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नागपूरची रहिवासी आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी तिने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर ‘वी मायग्रेट’ नावाच्या एजन्सीची जाहिरात पाहिल्याचा दावा केला आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनानंतर पासपोर्टसाठी हैदराबादला जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एजन्सीला सुमारे 4 लाख रुपये दिल्याचे महिलेने सांगितले.

तिला मुंबई–अबूधाबी–माद्रिद असा प्रवास असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, माद्रिद येथे पोहोचल्यानंतर एका पंजाबी व्यक्तीकडे तिला सोपवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन काढून घेण्यात आल्याचेही महिलेने सांगितले.

पोर्तुगालमध्ये नेल्यानंतर नेमकं काय घडलं?

पीडित महिलेच्या आरोपानुसार, तिला पोर्तुगालमधील ओडिमेरा येथे नेण्यात आले. तेथे तिच्याकडून बीअर शॉपमध्ये तसेच घरकाम करून घेतले जात होते. काही काळानंतर तिला स्टुडंट व्हिसा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच तेथेच राहून मालक आणि इतर व्यक्तींना ‘खुश’ ठेवण्याचा दबाव आणण्यात आल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

या प्रकारामुळे तिच्यावर शरीरविक्रीसाठी दबाव आणला जात असल्याचे तिला जाणवले आणि तिने तेथून सुटण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

पहाटे तीन वाजता केली सुटका

जीवाला धोका असल्याची भीती वाटल्याने महिला एका रात्री पहाटे सुमारे तीन वाजता तेथून बाहेर पडल्याचा दावा आहे. त्यानंतर बसने माद्रिद गाठून विमानाने दिल्ली आणि पुढे भारतात परतल्याचे तिने सांगितले.

भारतामध्ये परतल्यानंतरही संबंधितांकडून दबाव आणि धमक्या येत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तिच्या पतीविरोधात खोट्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्याची धमकी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

आणखी किती महिला या जाळ्यात?

या कथित रॅकेटमध्ये आणखी किती महिला किंवा विद्यार्थी अडकले आहेत, तसेच ते सध्या कोणत्या देशात आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित एजन्सी आणि कथित व्यक्तींची भूमिका तपासल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

परदेशात नोकरीच्या आमिषाने मानवी तस्करी किंवा फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी कोणत्याही परदेशी रोजगार एजन्सीमार्फत जाण्यापूर्वी तिची नोंदणी, परवाना, नोकरीचे अधिकृत ऑफर लेटर, व्हिसाचा प्रकार आणि करारपत्र यांची पडताळणी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पीडित महिलेने केलेल्या आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी होणे आवश्यक असून, या कथित आंतरराष्ट्रीय रॅकेटमागे नेमके कोण आहेत आणि आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत