मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल तसेच आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत महामानव प्रतिष्ठान आणि ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या वतीने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिनाभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे.
महापुरुषांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच विविध मान्यवरांच्या वाढदिवसांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या खर्चातील काही भाग समाजोपयोगी उपक्रमांकडे वळवून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावावा, असे आवाहन अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अंतर्गत विद्यार्थी दत्तक घेणे, विनामूल्य MPSC-UPSC मार्गदर्शन वर्ग सुरू करणे, शाळा व वस्त्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, असे विविध उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि रमाई आदी महापुरुष व महामातांच्या जयंतीनिमित्त वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर वह्या, पेन, पुस्तके, दप्तरे, कपडे तसेच वापरात नसलेले पण सुस्थितीतील मोबाईल, संगणक, लॅपटॉप यांसारख्या वस्तू पुतळ्यांपाशी अर्पण करून संबंधित समितींनी त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत मुंबईसह राज्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना महिनाभर शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. इच्छुकांनी सहभाग नोंदवण्यासाठी व साहित्य देण्यासाठी अभियानाचे प्रणेते राजू झनके यांच्याशी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.