सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात; १७ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने परीक्षा

महाराष्ट्र

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या २४ मार्चपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे.

उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., एम.पी.एड. व बी.एड.-एम.एड. या सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा ‘सीईटी’ कक्षाने निश्चित केल्या आहेत. या सात अभ्यासक्रमांपैकी सहा प्रवेश परीक्षांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर एलएलबी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमासाठी नोंदणीची मुदत रविवार (ता. १५) पर्यंत देण्यात आली आहे.

२०२६ मधील पहिली सीईटी २४ मार्च रोजी होणार असून त्या दिवशी एम.पी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १७ मेपर्यंत एकूण १७ सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यांत या प्रवेश परीक्षा पार पडतील.आत्तापर्यंत १२ लाख ९४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दोन्ही संधी मिळून १७ लाख ४२ हजार ६० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

या प्रवेश परीक्षांची प्रवेशपत्रे संबंधित परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती, प्रवेशपत्र व सूचनांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक असे :

एम.पी.एड. – २४ मार्च

एम.पी.एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन) – २५ मार्च

एम.एड. – २५ मार्च

बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी) – २७ ते २९ मार्च

एलएलबी (तीन वर्षे) – १ ते २ एप्रिल

बी.पी.एड. – ४ एप्रिल

बी.पी.एड. (शारीरिक चाचणी ऑफलाइन) – ५ ते ७ एप्रिल

बी.एड.-एम.एड. (तीन वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) – ९ एप्रिल

एलएलबी (पाच वर्षे) – ८ मे