अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू

महाराष्ट्र

साखरखेर्डा: येथील शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यवतमाळ येथे वास्तव्यास असलेले त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे हेही बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी साखरखेर्डा येथे आले होते.

अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सर्व मंडळी घरी परतली असताना राम ढोबळे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. मगर यांच्याकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याने सुरळकर व ढोबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राम नामदेव ढोबळे यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी यवतमाळ येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. बहिणीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या भावाने बहिणीच्या दारातच प्राण सोडल्याची भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.