जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत मोदी अव्वल; नव्या भारताच्या सामर्थ्याला जगाची मान्यता; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप घेतली असून, आता जगातील महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावत नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “हा केवळ नरेंद्र मोदी यांचा विजय नसून नव्या भारताच्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार आहे.” या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्यांनाही मोदी यांनी मागे टाकल्याचे समोर आले आहे.

शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली आहे. एकेकाळी जागतिक निर्णयांचे परिणाम स्वीकारणारा भारत आज जागतिक घडामोडींना दिशा देणाऱ्या प्रभावी राष्ट्रांच्या पहिल्या रांगेत उभा आहे.

लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरी या क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे जागतिक शक्तीच्या समीकरणांमध्ये भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला कृतीची जोड देत मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे आणि देशाचा सन्मान व स्वाभिमान अधिक उंचावला आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना शिंदे म्हणाले, भारताला विश्वगुरूपदाच्या दिशेने नेणाऱ्या या नेतृत्वाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा तिरंगा जागतिक व्यासपीठावर अधिक उंच फडकत असून, हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि नव्या भारताच्या उदयाचा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत