अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास

मुंबई: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षित क्षेत्रांचा विकास तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला.

प्रस्तावानुसार मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, वाहनतळ उभारणी, आरक्षित जागांचा विकास आणि परिसराचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी म्हाडाने सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे.

याशिवाय पालखी मार्ग, समाधी मंदिर परिसर, शहरातील वाहतूक व्यवस्था, तलाव, बगीचे आणि अन्य सार्वजनिक सुविधांचाही विकास या आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होऊन भाविकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येतील आणि नियोजन व विकासाची संपूर्ण जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात येईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या सर्वंकष विकासाला मोठी चालना मिळणार असून राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या या परिसराच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत