मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्ये केली जात आहेत. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली होती आणि लवकरच याबाबत घोषणा होणार होती, असा दावा करण्यात येत आहे. विलीनीकरण ही अजितदादांची इच्छा होती आणि ती पूर्ण व्हावी, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर आज मुंबईत असलेले शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा अचानक रद्द करत बारामतीच्या दिशेने प्रयाण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुनेत्रा पवार शपथविधीनंतर पुढील काही दिवस बारामतीत असणार असून, त्याचवेळी शरद पवार यांचीही बारामतीतील उपस्थिती पवार कुटुंबात राजकीय एकीबाबत चर्चा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली होती. सुमारे ४५ मिनिटे झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी अदानी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अदानी यांचा काही दिवसांपूर्वीचा बारामती दौरा आणि त्यानंतरची ‘डिनर डिप्लोमसी’ही चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विलीनीकरणावरून संभ्रम कायम
मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना विलीनीकरणाची शक्यता धूसर असल्याचं स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार यांनी माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले असता तटकरे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
‘अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा सामूहिक निर्णय घेतला असून, आम्ही त्यांच्यासोबतच कायम राहणार आहोत,’ असं तटकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत, ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असत्या तर अजितदादांनी मला सांगितलं नसतं का?’ असा सवाल केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना, १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा होणार होती, असं सांगितल्याने चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
आता शरद पवारांचा बारामती दौरा, सुनेत्रा पवारांची उपस्थिती आणि पडद्यामागील हालचाली पाहता, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय होणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.