मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे.
महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मदत केली जाते.
महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक शाल व पुष्पगुच्छ घेऊन भेटीस येत आहेत. मात्र, या औपचारिक स्वागतापेक्षा गरिब रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत अधिक उपयुक्त ठरेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
नागरिकांना सुलभरीत्या देणगी देता यावी यासाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात येत आहे. महापौर कार्यालयाच्या दर्शनी भागावर हा क्यूआर कोड लावण्यात येणार असून त्याद्वारे थेट महापौर निधीस देणगी देता येईल. नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद देऊन गोरगरिबांच्या आरोग्य सेवेत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.